खराडी-केशवनगर पूल १५ ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार – स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

पुणे/प्रतिनिधी : खराडी आणि मुंढवा-केशवनगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुळा-मुठा नदीवर उभारण्यात आलेल्या खराडी-केशवनगर पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून, केशवनगरकडील सुमारे ७०० मीटर लांबीच्या जोडरस्त्याचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जोडरस्ता पूर्ण होताच पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

खराडी, मुंढवा, केशवनगर, मगरपट्टा, हडपसर, वाघोली आणि वडगाव शेरी परिसरात आयटी कंपन्या, व्यावसायिक संकुले, शैक्षणिक संस्था आणि मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. ही समस्या सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने तीन वर्षांपूर्वी मुळा-मुठा नदीवर नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. पथ विभागाने २३ कोटी २० लाख रुपयांच्या खर्चातून सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या पुलाचे काम हाती घेतले.

गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पातील पुलाचे मुख्य काम पूर्ण झाले आहे. खराडीकडील बाजूने सिग्नलसह वाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. मात्र, केशवनगरकडील रेणुकामाता मंदिर परिसरातून गोदरेजकडे जाणाऱ्या सुमारे ७०० मीटर जोडरस्त्याचे काम अद्याप सुरू असल्याने पूल वाहतुकीसाठी खुला करता आलेला नाही.

पावसाळ्यामुळे डांबरीकरणाच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. याशिवाय या रस्त्यासाठी आवश्यक असलेली सुमारे २५० मीटर लांबीची संरक्षक भिंत उभारण्याचे कामही सुरू आहे.

Please follow and like us: