पुणे/प्रतिनिधी : मंगळवार पेठेतील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) भूखंडावरील सार्वजनिक/निमसार्वजनिक (पीएसपी)आरक्षण कायम ठेवून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर गरीब विद्यार्थी वसतिगृह, लोकोपयोगी उपक्रम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्ताराला मान्यता देण्याची शिफारस करणाऱ्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली. ही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
या विषयाला यापूर्वी शहर सुधारणा समितीने मान्यता दिली होती. नगरसेविका नंदिनी धेंडे यांनी यासंदर्भात शहर सुधारणा समितीकडे पत्र सादर करून संबंधित भूखंडावरील आरक्षण कायम ठेवण्याची तसेच आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारासाठी आवश्यक निर्णय घेण्याची मागणी केली होती.
प्रस्तावानुसार, संबंधित भूखंडावरील पीएसपी झोन कोणत्याही कायद्याअंतर्गत बदलू नये आणि तो कायम ठेवावा, अशी भूमिका नोंदविण्यात आली आहे. तसेच या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर गरीब विद्यार्थी वसतिगृह, इतर लोकोपयोगी उपक्रम आणि भव्य स्मारकाचा विस्तार करण्यास शासनाने मान्यता द्यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.
याशिवाय, या कामासाठी राज्य शासनाने चालू आर्थिक वर्षात २५ कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही शिफारस करण्यात आली आहे. विकास आराखड्यात संबंधित जागेचा झोन बदलण्यासाठी आवश्यक वैधानिक प्रक्रिया शासन स्तरावर पूर्ण करून महापालिकेच्या अभिप्रायास मान्यता द्यावी, अशी शिफारस स्थायी समितीने मुख्य सभेकडे पाठविली आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावरील अभिप्राय स्वीकारताना सदस्य वैशाली बनकर आणि रुपाली धावडे यांनी उपसूचना मांडली. त्यानुसार आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडे २५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात यावी आणि त्या प्रस्तावावर ३० दिवसांच्या आत निर्णय घेण्याची मागणी सरकारकडे करण्यात यावी आणि यावर्षी ऑक्टोबरपर्यंत राज्य शासनाचा निधी प्राप्त झाला नाही तर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून स्मारकाचे काम सुरू करावे अशी शिफारस करण्यात आली. या उपसूचनेला समितीने मंजुरी दिली.