आंबेडकराईट स्टूडंट असोसिएशन चे प्रश्न येत्या मंगळवारी मंत्रालयात संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांनी दिले

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) अंतर्गत पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अधिछात्रवृत्तीच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशन’ आणि फेलोशिपसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज पुणे येथील शासकीय विश्रामगृह (Government Rest House) येथे संजयजी शिरसाठ (मंत्री, सामाजिक न्याय ) यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले.

या भेटीदरम्यान मा. संजयजी शिरसाठ यांनी फेलोशिपसाठी अर्ज केलेले विद्यार्थी, संशोधक आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी अत्यंत सलोख्याने व सविस्तर चर्चा करून सर्व तांत्रिक व व्यावहारिक मुद्दे समजून घेतले. बार्टीच्या केवळ १०० जागांमुळे विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय आणि ३५ वर्षांच्या वयोमर्यादेच्या अटीमुळे संशोधनात येणारे अडथळे यावर शिष्टमंडळाने त्यांचे लक्ष वेधले.

विद्यार्थ्यांची बाजू आणि विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन, मा. संजयजी शिरसाठ यांनी यावर कायमस्वरूपी व सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पुढील मंगळवारी मंत्रालयात संबंधित उच्चपदस्थ अधिकारी आणि विभागांची एक विशेष संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आणि या प्रश्नातून तात्काळ मार्ग काढण्याचे ठोस आश्वासन दिले.

शिष्टमंडळाची आक्रमक भूमिका व पाठपुरावा:
मा. संजयजी शिरसाठ यांनी दिलेल्या आश्वासनाचे शिष्टमंडळाने स्वागत केले आहे. राहुल डंबाळे, डॉ. राहुल ससाने, सीमा वानखेडे, अक्षय कांबळे, सिद्धार्थ ओव्हाळ, सुरेखा मेश्राम, प्रथमेश सूर्यवंशी आणि नितीन आंधळे यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रत्येक स्तरावर आक्रमक पाठपुरावा करत आहे.
मंत्रालयातील आगामी बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा संघटनेला आहे; मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत कोणतीही तडजोड न करता १९ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे समाजकल्याण आयुक्त कार्यालयासमोर होणाऱ्या ‘बेमुदत धरणे आंदोलनाची’ पूर्वतयारी आणि रणनीती देखील समांतरपणे जोमाने सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे ‘आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशन’ने स्पष्ट केले आहे.

Please follow and like us: