पुणे : कंत्राटदाराला भरमसाठ भाडे देण्याऐवजी, निविदा रकमेच्या उपलब्ध निधीमधून पुणे महानगरपालिकेने स्वतःच्या मालकीच्या ४ JCB ३DX मशीन खरेदीबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त यांना अँड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम, गटनेता काँग्रेस पक्ष, पुणे महानगरपालिका यांनी मागणी केली आहे. ते निवेदनामध्ये म्हणतात कि, पुणे मनपाच्या विविध रॅम्पवरील कामे करण्यासाठी जेसीबी (एस्कॅव्हेटर लोडर ) मशीन भाडेतत्त्वावर घेण्यासाठी मागविलेल्या निविदांपैकी मे. अभिजित एन्टरप्रायझेस, पुणे यांचेकडून तडजोडीने आलेल्या 1,31,34,000/- रुपये इतक्या रकमेच्या प्रस्तावास प्रशासनाकडून दिनांक 07/09/2026 रोजी मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. सदर प्रस्तावाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, मशीन चालू करून नुसते जागेवर उभे असताना किंवा चालताना येणारा प्रत्यक्ष डिझेल व चालकाचा खर्च विचारात घेता, ठेकेदाराने भरलेला दर आणि प्रशासनाने तयार केलेले अंदाजपत्रक हे सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD / MJP) च्या 1401 रुपये प्रति तास या दराच्या तुलनेत आणि प्रत्यक्ष बाजारभावाच्या विसंगत आहे.
सध्याच्या कंपनी दरपत्रकानुसार (दिनांक 16/09/2026) नवीन JCB ३DX मशीनची किंमत पुणे पोहोच अंदाजे 30 लाख रुपये प्रति मशीन इतकी होत आहे. निविदा रक्कमेच्या (रु. 1,31,34,000/-) या निधीमध्ये पुणे महानगरपालिका स्वतःच्या मालकीच्या जवळपास 4 नवीन JCB मशीन खरेदी करू शकली असती. मशीनच्या प्रत्यक्ष खरेदी किंमतीपेक्षा कैक पटीने अधिक भाडे एकाच वर्षाच्या किंवा अल्पमुदतीच्या कंत्राटासाठी ठेकेदाराला देणे ही पुणेकरांच्या पैशांची उघड उधळपट्टी व मनपाच्या आर्थिक हितसंबंधांना बाधक ठरणारी बाब आहे. 5 JCB मशीनला भाडेतत्त्वावर देणाऱ्या निविदा रक्कमेच्या (रु. 1,31,34,000/-) या निधीमध्ये पुणे मनपाची स्वमालकीची ४ नवीन मशिनरी जी भविष्यात १५ वर्ष पुणे मनपाला फक्त डीजेल व ड्रायवरच्या मोबदल्यात सेवा देऊ शकते. पुढील मागण्या आम्ही स्थायी समितीत दाखल प्रस्ताव बाबत करत आहोत.
१. विषय पत्र क्र. 1163 नुसार ठेकेदाराने भरलेला टेंडर दर हा प्रति मशीन 800 रुपये तास इतका येत आहे. आणि प्रशासनाने तयार केलेले अंदाजपत्रक हे सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (PWD / MJP) यांच्या 1401 रुपये प्रति तास या दराच्या तुलनेत आणि प्रत्यक्ष बाजारभावाच्या विसंगत आहे.
निविदा प्रकरणी तासांचा दर अवघा 800 रुपये प्रति तास एवढा कमी आल्यास सदर प्रकरणी होणाऱ्या भ्रष्ट व आशक्य बाबीस मोठ्या प्रमाणावर विरोध होईल याची पूर्व कल्पना असल्याने वेहिकल डेपो प्रशासनानी निविदा हि तासांवर ऐवजी रकमेवर मागवली. सदर काम ताशी पद्धतीने करावयाचे असल्याने सदर निविदा हि ताशी पद्धतीने मागवणे क्रम प्राप्त होते. मात्र जाणीवपूर्वक मोटार वाहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विभागाने हे निविदा एकत्रित ताशी पद्धतीने होणाऱ्या रकमेवर पूर्वगनक पत्र बनवून मागवली. हि बाब जाणीवपूर्वक संबंधित निविदा आर्थिक हित संबंधित ठेकेदारांना मिळवून देण्यासाठी मोटार वाहन विभागाने कार्यन्वित केलेली आहे.
२. पुणे मनपाच्या विविध रॅम्पवर जेसीबी मशीन भाडेतत्त्वावर घेण्यासाठी मे. अभिजित एन्टरप्रायझेस, पुणे यांना देण्यात आलेला व प्रशासनाने दिनांक 07/09/2026 रोजी सादर केलेला 1,31,34,000/- रुपये किमतीचा प्रस्ताव फेरविचार करण्यात यावा व ज्या मशीनरीच्या भाडे रकमे पेक्षा मशिनरीची किंमत कमी असल्यास पुणे मनपाने स्वमालकीची माशिनरी विकत घ्यावेत. सदर निविदा प्रक्रियेत तांत्रिक व आर्थिक बाबतीत असणारी विसंगती आणि सार्वजनिक निधीचा होणारा अपव्यय पाहता, सदर निविदा प्रक्रिया तात्काळ रद्दबातल (Cancel) घोषित करण्यात येत आहे.
३.कंत्राटदाराला भरमसाठ भाडे देण्याऐवजी, निविदा रकमेच्या उपलब्ध निधीमधून पुणे महानगरपालिकेने स्वतःच्या मालकीच्या ४ JCB ३DX मशीन खरेदी कराव्यात, जेणेकरून मनपाचा स्थायी स्वरूपात खर्च वाचेल आणि कचरा रॅम्पवरील कामांवर मनपाचे प्रभावी नियंत्रण राहिल.
सदर प्रकरणी आयुक्तांनी तातडीने गांभीर्य पूर्वक कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल व योग्य त्या न्याय संस्थेकडे दाद मागितली जाईल.