पुणे : पुण्याला जागतिक क्षमता केंद्रांचे (Global Capability Centre – GCC) प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने तसेच उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा आणि गरजा जाणून घेण्यासाठी ‘व्हाय नॉट पुणे?’ या विषयावर माहिती-तंत्रज्ञान, तंत्रज्ञान, उत्पादन क्षेत्र तसेच विविध उद्योगांतील देशपातळीवरील प्रमुख आणि वरिष्ठ प्रतिनिधींसोबत उच्चस्तरीय संवादाचे आयोजन करण्यात आले.
या संवादाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यात उत्पादन, तंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची भक्कम पायाभूत परिसंस्था असून, त्यामुळे GCC केंद्रांसाठी पुणे हे नैसर्गिक आणि सक्षम ठिकाण आहे. राज्य शासनाने स्वतंत्र GCC धोरण तयार केले असून पुण्याला प्रमुख GCC हब म्हणून विकसित करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र GCC धोरण २०२५ अंतर्गत राज्यात सुमारे ४०० नवीन GCC केंद्रे आकर्षित करण्याचे तसेच ४ लाख उच्च-कौशल्याधारित रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या एकात्मिक पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने मेट्रो, रिंग रोड, बोगदे तसेच विविध वाहतूक आणि दळणवळणविषयक प्रकल्पांचा उल्लेख केला. या माध्यमातून शहरातील कनेक्टिव्हिटी आणि राहणीमान अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सक्षम मनुष्यबळ हे GCCच्या विकासासाठी महत्त्वाचे बलस्थान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी धोरणातील संभाव्य त्रुटी, कार्यपद्धतीतील अडचणी तसेच शासनाच्या पुढील हस्तक्षेपाची आवश्यकता असलेली क्षेत्रे याबाबत सूचना मांडाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. व्यवहार्य आणि योग्य सूचनांचा गांभीर्याने विचार करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शासन, प्रशासन आणि उद्योग क्षेत्रातील परस्पर सहकार्याच्या माध्यमातून पुण्यात मजबूत आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक GCC परिसंस्था विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे यांनी या संवादासाठी उपस्थित राहिलेल्या उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि वरिष्ठ प्रतिनिधींचे आभार मानले. अशा प्रकारच्या संवादातून पुणे शहर, उद्योग क्षेत्र आणि जागतिक व्यावसायिक समुदाय यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. पुण्याच्या भविष्यातील विकासासाठी प्रशासन आणि उद्योग क्षेत्रातील सातत्यपूर्ण सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी सांगितले की, उद्योग क्षेत्र आणि प्रशासन यांच्यातील संवादातील दरी कमी करणे, पुण्याच्या ठोस विकास आराखड्यांची माहिती देणे, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि भविष्यातील संधी याबाबत उद्योग क्षेत्राला अवगत करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
हा संवाद केवळ प्रशासनाकडून माहिती देण्यापुरता मर्यादित नसून, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या सूचना आणि अपेक्षा मांडाव्यात आणि त्यानुसार शहराच्या विकासाच्या योजना अधिक व्यावहारिक, प्रतिसादक्षम आणि उद्योगाभिमुख करता याव्यात, यासाठी हे व्यासपीठ असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
पुणे हे विविध क्षेत्रांचा समतोल साधणारे शहर आहे. पुण्याची ही वैशिष्ट्यपूर्ण ओळख कायम राखत त्याचवेळी विविध क्षेत्रांसाठी प्रमुख गुंतवणूक आणि व्यवसाय केंद्र म्हणून शहराचा विकास करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले.
या संवादामध्ये मा.पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्रीमती पवनीत कौर, मा. पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्री.ओमप्रकाश दिवटे तसेच प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते.
बैठकीतून प्राप्त होणाऱ्या सूचना आणि अपेक्षांचे एकत्रित संकलन करून त्याचे कृती आराखड्यात रूपांतर करण्यात येईल. त्यानंतर संबंधित कामांचा आढावा घेऊन त्यांची अंमलबजावणी आणि पाठपुरावा सुनिश्चित करण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
या संवादाच्या माध्यमातून शासन आणि उद्योग क्षेत्रातील सातत्यपूर्ण संवादाची प्रक्रिया अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, पुण्याची GCC, तंत्रज्ञान, नवोन्मेष, कुशल मनुष्यबळ आणि भविष्यातील आर्थिक विकासासाठीची परिसंस्था अधिक सक्षम करण्यास यामुळे चालना मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकार आणि पुणे महापालिका पूर्ण सहकार्य करेल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘पुणे का नाही?’ या विचारातून पुण्याला जागतिक कंपन्यांसाठी अधिक सक्षम गुंतवणूक केंद्र बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या बैठकीमुळे पुण्यातील नव्या गुंतवणुकीसाठी सकारात्मक पाऊल पडले असून, भविष्यात रोजगाराच्या आणखी मोठ्या संधी निर्माण होतील.”
सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, “पुण्यातील जागतिक क्षमता केंद्रांनी आतापर्यंत जवळपास एक लाख रोजगार निर्माण केले आहेत. या क्षेत्राचा भविष्यात आणखी विस्तार व्हावा आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर नवीन गुंतवणूक यावी, यासाठी या क्षेत्रातील प्रमुखांशी थेट संवाद साधणे गरजेचे होते. त्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली.