मुंबई : लखानी परिवारासाठी मोठे साहेब महाविकास आघाडीचा उमेदवार गायब करून बिनविरोध निवडणूक करू शकतात तर कराळे मास्तरसाठी का नाही? असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी कराळे मास्तर यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातून केलेल्या हकालपट्टीवर सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे. नितेश कराळेंना न्याय मिळाला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
सुजात आंबेडकर म्हणाले की, दोन प्रकारचे प्राध्यापक असतात. एक ते जे विद्यार्थ्यांच्या विरोधात भूमिका घेतात. विद्यार्थ्यांचे शोषण करतात. उदा. प्रा. पी. अप्पा राव (डॉ. रोहित वेमुला संस्थात्मक हत्येप्रकरणी आरोपी), प्रा. डुल्ला (साहिल वाकोडे संस्थात्मक हत्येप्रकरणी आरोपी) दुसरे प्राध्यापक असतात आयआयटी मुंबईमधील प्रा. सूर्यकांता वाघमारे, प्रा. विठ्ठल कांगणे, प्रा. नितेश कराळे सारखे. जे विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहतात. त्यांच्या न्याय-हक्कासाठी भूमिका घेतात आणि त्यांचे संरक्षण करतात.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने कराळे मास्तर सारखा ऍसेट गमावला आहे. सध्याच्या जेन झीच्या वातावरणात भूमिका घेणाऱ्या कराळे मास्तर सारख्या व्यक्तीचा फायदा घेता आला असता. असेही त्यांनी सांगितले.
शरद पवार यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, मोठ्या साहेबांचा इतिहास राहिला आहे. वरती सेटलमेंट, खाली कार्यकर्त्यांचा बळी! एका महिन्यापूर्वी मी वर्धा येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने गेलो होतो. तेव्हाच कराळे मास्तरांना सांगितले होते की, हा पक्ष तुमचा गेम करेल. ते आज घडतांना दिसले.