दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा खडकवासला महाविकास आघाडीकडून तीव्र निषेध; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे/प्रतिनिधी : दिल्ली येथे शैक्षणिक मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ खडकवासला विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या वतीने आज सिंहगड रस्त्यावरील ह.भ.प. पांडुरंगशास्त्री आठवले चौक येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करत विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे आदेश देणाऱ्या तसेच त्याची अंमलबजावणी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी उपस्थित नेत्यांनी सांगितले की, “लोकशाही व्यवस्थेत विद्यार्थ्यांना आपल्या प्रश्नांसाठी शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्यांच्या मागण्यांवर संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करणे हे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारे आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही.”

दिल्लीतील या घटनेचे पडसाद देशभर उमटत असून, त्याविरोधात खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीने आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दर्शविला.

यावेळी माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसच्या अध्यक्षा दीप्ती चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे महानगरपालिकेतील गटनेते तथा नगरसेवक सोपान ऊर्फ काकासाहेब चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला शहराध्यक्ष स्वाती पोकळे, अनिता इंगळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खडकवासला विधानसभा अध्यक्ष शिवाजी मते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधानसभा अध्यक्ष संदीप मते, काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सुरेश मते, काँग्रेस पक्षाचे संघटक मिलिंद पोकळे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष रुपेश घुले, अनिकेत चव्हाण, शरद दबडे यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवक संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please follow and like us: