पुणे/प्रतिनिधी : पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पुणे शहराच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. शहरातील गुन्हेगारीवर तातडीने प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी कठोर व ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पुणे शहरात खून, खंडणी, कोयता गँगचा वाढता धुमाकूळ, टोळी युद्ध, अंमली पदार्थांची विक्री, मानवी तस्करी, महिलांवरील अत्याचार, सायबर गुन्हे तसेच वाढती वाहतूक कोंडी यांसारख्या गंभीर समस्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोयता गँग आणि टोळी युद्धाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तसेच महिलांविरुद्ध होणारे गुन्हे, कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार, विनयभंग तसेच सोशल मीडियाद्वारे होणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली. शहरात वाढत असलेल्या ड्रग्जच्या अवैध विक्रीसह रेव्ह पार्टींवर कठोर कारवाई करून संबंधितांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे शहरातील पोलीस दलाची मनुष्यबळ क्षमता वाढविणे, संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त मजबूत करणे, नियमित गस्त वाढविणे, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आणि नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.
पुण्यासारख्या वेगाने विस्तारत असलेल्या महानगरात नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शासन व पोलीस प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने या निवेदनाद्वारे व्यक्त केली.
खासदार शरदचंद्रजी पवार साहेब आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेनुसार पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, माजी महापौर अंकुश काकडे, महापालिका गटनेते काकासाहेब चव्हाण, विशाल तांबे, मनाली भिलारे, प्रवीण तुपे, किशोर कांबळे, अतुल धावडे या शिष्टमंडळाने
भेट घेतली यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.