माऊलीनगर, शेलारमळा, उक्तर्ष सोसायटी, राजस चौक, गोकुळ नगर या परीसरातील वाहतुकीसाठी ग्रेड सेपरेटरचा वापर होणार असल्याने सेवा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होणार आहे
पुणे : पुणे महानगरपालिका क्षेत्रातील दक्षिण भागातील महत्वाचा कात्रज-कोंढवा रस्ता भूसंपादना अभावी २०१७-१८ पासून रखडलेला होता. मा.महापालिका आयुक्त व मा. जिल्हाधिकारी, पुणे यांनी या रस्त्यासाठीचे भूसंपादन जलदगतीने करून, रस्ता विकसनामधील मोठा अडथळा दूर केलेला आहे. आता रस्त्याचे विकसन द्रुत गतीने सुरु करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने रस्ता विकसनात येणारे विद्युत पोल व ट्रान्सफॉर्मर एका आठवड्यामध्ये स्थलांतरित करण्यासाठी सूचना विद्युत विभागास देण्यात आल्या. तसेच ट्रांसफार्मर रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागा उपलब्ध करून देणेस मालमत्ता व व्यवस्थापन विभागात सूचना देण्यात आलेल्या आहेत. रस्ता भूसंपादनामध्ये अद्यापपर्यंत दहा मिळकती संपादन न केल्यामुळे रस्ता सलगपणे विकसन करणेस अडथळे येत असल्याने, मा. महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी तातडीने भूसंपादन करणेबाबत विशेष भूसंपादन अधिकारी तसेच मा. उपायुक्त भूसंपादन विभाग, यांस निर्देश दिलेले आहेत.
तसेच रस्ता विकासनात अडथळा येणाऱ्या बाबींची नकाशा सहित माहिती अहवाल तयार करून व त्या संबंधित अधिकारी यांच्याकडून पूर्तता करून घेण्यासाठी पुढील आठवड्यात बैठकीचे नियोजन करण्याचे निर्देश नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचेकडून राजस चौकात उतरणाऱ्या उड्डाणपुलासाठी सर्विस रस्त्याचे काम पुणे महानगरपालिकेकडून पूर्ण झालेल्या कामाची पाहणी मा. महापालिका आयुक्त यांनी समक्ष केली असून, उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण होणेबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. राष्ट्रीय महामार्ग यांचा उड्डाणपूल व कात्रज कोंढवा रस्त्याचे विकसन पूर्ण झाल्यानंतर मुंबई-बंगलोर महामार्गावरील सासवडकडे येणारी-जाणारी जड वाहतूक सुरळीत होणार आहे. तसेच माऊलीनगर, शेलारमळा, उक्तर्ष सोसायटी, राजस चौक, गोकुळ नगर या परीसरातील वाहतुकीसाठी ग्रेड सेपरेटरचा वापर होणार असल्याने सेवा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होणार आहे.
तसेच गंगाधाम चौकातील कामाची पहाणी करून उड्डाणपुलाचे काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या चौकातील सलग्न रस्ता करण्यासाठी कलम २०५ अन्वये रस्त्याचे काम चालू आहे. त्यातील काही मिळकतदार यांनी जागा ताब्यात न दिल्याने सदर मिळकत दारांशी चर्चा करून जागा तडजोडीने ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. गंगाधम चौकातील उड्डाणपूल झाल्यास मार्केट यार्ड ते कोंढवा येथील होणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
वडगाव येथील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, नवले पुलाजवळील सर्व्हिस रस्त्याचे कामाबाबत पाहणी केली असता सदर रस्त्याचे स्वर्ण हॉटेल ते कुदळे कमानी पर्यंतचे अंदाजे २०० मीटर लांबीचे रखडलेले कामासाठी संबंधित जागामालकाशी चर्चा करून किंवा तडजोडीने जागा ताब्यात घेणेबाबत आदेश दिलेले आहेत. सदरचा रस्ता विकसित झाल्यास राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक कोंडीची समस्या कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
सदर ठिकाणी जागा पाहणी दरम्यान अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री.ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता श्री.अनिरूध्द पावसकर, मुख्य अभियंता (पथ) श्री. राजेश बनकर, मुख्य अभियंता (विद्युत) श्रीमती मनीषा शेकटकर, मा. उपायुक्त श्री.निखील मोरे, मा. उपायुक्त श्री. अरविंद माळी आणि महानगरपालिकेकडील इतर संबंधित अधिकारी पाहणी दरम्यान उपस्थित होते.
Please follow and like us: