पुणे : दि. १५ ऑगस्ट रोजी संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा हडपसर या ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध गायक व शाहीर अमरजी पुणेकर हे उपस्थित होते. अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यामध्ये समूह गायन, भाषण आणि नृत्य सादरीकरण इत्यादी बाबींचा समावेश होता. त्याचप्रमाणे पालकांनी आपले मनोगतरुपी विचार मांडले. अमरजी पुणेकर यांनी मनोगत व्यक्त करताना दिव्यांग व्यक्ती समाज रचनेत विविधतेने संपन्न असलेला एक विशेष घटक असून दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता कलागुण विशेष भूमिका बजावतात, परंतु अशा विद्यार्थ्यांकडे शासनाने लक्ष घालून त्यांच्यासाठी योग्य त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष इनायतभाई शेख हे होते. तसेच कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते उमेशजी शिरोडकर, सुनील कथुरिया, एस.डी.शेख, शिक्षक वर्ग विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना शालेय साहित्य, बक्षीसे, व खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सीमा नानल मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले. अशाप्रकारे कार्यक्रमाची समाप्ती झाली.