स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन; माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणे : भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यलढ्यातील वीर स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले.


ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवर व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन केले. अजितदादांच्या कार्याला आणि त्यांच्या जनसेवेच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित करत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. स्वातंत्र्य, लोकशाही आणि देशाच्या एकतेचे मूल्य जपत समाजाच्या विकासासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.


याप्रसंगी “आज देशाच्या स्वातंत्र्यदिनी प्रथमच अजितदादांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी निश्चितच जाणवते,” अशी भावना व्यक्त करत उपस्थितांनी अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन केले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या. देशाच्या प्रगतीसाठी, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि समाजहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
देशभक्तीचा उत्साह, राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन अशा भावपूर्ण वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातील स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष श्री. सुनील टिंगरे, श्री. सुभाष जगताप, विरोधी पक्षनेते निलेश निकम, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, अक्रूर कुदळे, नगरसेवक, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please follow and like us: