प्रत्येक अंगणवाडीसाठी २० बाय २५ फुटांची जागा देणार – श्रीनाथ भिमाले

स्वच्छतागृह, स्नानगृह आणि स्वयंपाकघराचीही व्यवस्था;

पुणे : पुणे महापालिका हद्दीतील अंगणवाड्यांसाठी भाड्याच्या छोट्या खोल्यांऐवजी कायमस्वरूपी आणि सुविधायुक्त इमारती उभाराव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. प्रत्येक अंगणवाडीसाठी सुमारे २० बाय २५ फुटांचे पक्के बांधकाम करून त्यामध्ये स्वतंत्र स्वच्छतागृह, स्नानगृह आणि स्वयंपाकघराची व्यवस्था करावी, अशी सूचना नगरसेवक डॉ. दादा कोद्रे यांनी स्थायी समितीसमोर केली. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

महापालिका हद्दीत एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस) योजनेअंतर्गत मोठ्या संख्येने अंगणवाड्या सुरू आहेत. त्यापैकी सुमारे ९० टक्के अंगणवाड्या भाड्याच्या जागेत चालविल्या जात असून, अनेक ठिकाणी केवळ १० बाय १० फुटांच्या खोल्यांमध्ये २५ ते ३० बालकांना बसविले जाते. त्यामुळे बालकांना पुरेशी जागा मिळत नसून, त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.

अंगणवाडी ही बालकांच्या शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिक विकासाची पहिली पायरी आहे. त्यामुळे अंगणवाडीची जागा केवळ वर्ग घेण्यासाठी पुरेशी असण्याऐवजी बालकांसाठी आवश्यक सर्व मूलभूत सुविधांनी युक्त असणे गरजेचे आहे. प्रत्येक अंगणवाडीसाठी २० बाय २५ फुटांची पक्की इमारत उभारल्यास बालकांना पुरेशी जागा मिळण्याबरोबरच स्वच्छतागृह, स्नानगृह आणि स्वयंपाकघराची स्वतंत्र व्यवस्था करता येणार आहे.

आयसीडीएसच्या निकषांनुसार अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह, हात धुण्याची सुविधा, स्वयंपाकघर आणि मुलांच्या खेळासाठी मोकळी जागा असणे आवश्यक आहे. मात्र, भाड्याच्या लहान खोल्यांमध्ये या सुविधा उपलब्ध करून देताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे महापालिकेने स्वतःच्या जागांवर अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारती उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेच्या ताब्यातील सामाजिक सभागृहे, वाचनालये, महापालिका शाळांमधील रिकाम्या खोल्या आणि नागरी आरोग्य केंद्रांमधील वापरात नसलेल्या जागांचा तात्पुरता वापर अंगणवाड्यांसाठी करता येईल. तसेच विकास आराखड्यात अंगणवाडी आणि बालवाडीसाठी आरक्षित भूखंडांवर स्वतंत्र इमारती उभाराव्यात, अशीही मागणी आहे.

या कामासाठी नगरसेवक निधी, महिला व बालकल्याण निधी, जिल्हा नियोजन समितीचा निधी तसेच कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीचा वापर करण्याचा प्रस्तावात नमूद केले आहे. कायमस्वरूपी इमारती उभारल्यास अंगणवाडीतील बालकांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.

Please follow and like us: