भाजपच्या सत्ताकाळात नागरिकांना प्रशासनापासून दूर ठेवण्याची आणि त्यांच्या मूलभूत प्रशासकीय हक्कांवर गदा आणण्याची प्रवृत्ती वाढल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेतील नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद वाढवण्यासाठी दर सोमवारी दुपारी ३ ते ५ हा नागरिकांसाठी निश्चित केलेला ‘Citizen Open Day’ प्रभावीपणे राबवावा, तसेच या वेळेत सर्व संबंधित खातेप्रमुख व जबाबदार अधिकारी यांनी आपल्या कार्यालयात/दालनात नागरिकांसाठी उपलब्ध राहावे, अशी मागणी आम आदमी पार्टी, पुणे शहराचे अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.

पुणे महानगरपालिकेने यापूर्वी जारी केलेल्या कार्यालयीन परिपत्रकानुसार नागरिकांना दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत महापालिकेतील अभिलेख व दस्तऐवज पाहणीसाठी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.

याशिवाय महाराष्ट्र शासनाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी जारी केलेल्या शासन निर्णय/परिपत्रकाद्वारे नागरिकांना कार्यालयीन अभिलेखांची पाहणी करण्यासाठी निश्चित वेळ उपलब्ध करून देण्याच्या धोरणाला व्यापक स्वरूप दिले आहे.

मात्र भाजपच्या सत्ताकाळात नागरिकांना प्रशासनापासून दूर ठेवण्याची आणि त्यांच्या मूलभूत प्रशासकीय हक्कांवर गदा आणण्याची प्रवृत्ती वाढल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालणाऱ्या महापालिकेत नागरिकांनाच अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर हे लोकशाही आणि उत्तरदायी प्रशासनाच्या मूलभूत तत्त्वांना धरून नाही, असे जगदाळे यांनी म्हटले आहे.

प्रत्यक्षात अनेक वेळा सोमवारी दुपारी ३ ते ५ या नागरिकांसाठी निश्चित केलेल्या वेळेत खातेप्रमुख, वरिष्ठ अधिकारी किंवा संबंधित अधिकारी बैठका, दौरे अथवा अन्य कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने नागरिकांना संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेता येत नाही. त्यामुळे ‘Open Day’ ही व्यवस्था केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात नागरिकांना उपलब्ध झाली पाहिजे, अशी मागणी जगदाळे यांनी केली आहे.

“नागरिक कर भरतात आणि त्याच करातून महानगरपालिकेचा कारभार चालतो. त्यामुळे नागरिकांना भेटण्यासाठी प्रशासनाने निश्चित केलेली वेळ ही केवळ औपचारिकता राहता कामा नये. नागरिकांना अधिकारी भेटत नसतील, तर ‘Citizen Open Day’चा नेमका उद्देशच काय?” असा सवाल सुदर्शन जगदाळे यांनी उपस्थित केला.

“भाजपच्या सत्तेच्या काळात नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून प्रशासन नागरिकांपासून दूर ठेवण्याची पद्धत निर्माण झाली असेल, तर ती आता बदलण्याची गरज आहे. पुणेकरांना त्यांच्या हक्काची माहिती, अधिकाऱ्यांशी थेट संवाद आणि पारदर्शक प्रशासन मिळालेच पाहिजे,” असे जगदाळे यांनी सांगितले.

ही मागणी कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून पुणेकरांना पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिकाभिमुख प्रशासन मिळावे, या उद्देशाने करण्यात आली आहे, असे आपचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या विषयाची तातडीने दखल घेऊन स्पष्ट आदेश काढावेत, Citizen Open Day ची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी आणि त्या आदेशाची प्रत सार्वजनिक करावी, अशी विनंती आम आदमी पार्टीने केली आहे.

तसेच सर्व विभागांना विद्यमान शासन निर्देश व महापालिका परिपत्रकांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देऊन नागरिकांना त्यांच्या हक्काची सेवा प्रत्यक्ष मिळते आहे की नाही, याची स्वतःच्या स्तरावर तपासणी करावी, अशी मागणीही आपने केली आहे.

याप्रसंगी आपचे पदाधिकारी सुभाष कारंडे महासचिव, मिलिंद ओव्हाळ युवा उपाध्यक्ष, संतोष काळे उपाध्यक्ष, कुमार धोंगडे उपाध्यक्ष, अरुण केदारी, शितल कांडेलकर शिक्षक आघाडी अध्यक्ष, सुनिता काळे, माधुरी गायकवाड, अविनाश भाकरे, संजय रणधीर, अक्षय वायदंडे उपस्थित होते.

Please follow and like us: