बातम्या आल्या, कंत्राट दिले गेले पण काम कुठे आहे?: प्रदूषण नियंत्रण मंडळास पुणेकरांचा सवाल

पुणे : गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पुणे शहरात विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील तब्बल २०० ठिकाणी डेसिबल मीटरद्वारे ध्वनी पातळीची नोंद घेतली जाणार आहे. ढोल-ताशे, ध्वनिक्षेपक आणि अन्य ध्वनिवर्धक उपकरणांमुळे आवाजाची मर्यादा ओलांडली जात असल्याचे आढळल्यास प्रथम संबंधितांना आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या जातील. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे असे सांगितले गेले होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सोमवारपासून ( ता.१४) ध्वनी पातळी मोजण्यास सुरुवात झाली. दहा दिवस दररोज सायंकाळी सहा ते मध्यरात्री १२ या वेळेत विविध ठिकाणी ध्वनी पातळीची नोंद घेतली जाणार होती, पण याबाबत कुठलीही आकडेवारी, ध्वनी पातळी मोजणी तपशील समोर आलेला नसून अजूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुणावर गुन्हे दाखल केल्याची माहिती पुढे आलेली नाही.

मध्यंतरी लाऊड स्पीकर विरोधी पुणेकर मंचाचे मुकुंद किर्दत व अशोक मेहेंदळे यांनी पुणे प्रादेशिक अधिकारी बी एम कुकडे यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले होते व रोजच्या रोज या नोंदी वेबसाईट अथवा वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती. या विषयाचे गांभीर्य आपल्याला माहीत असून आपण यासंदर्भात कार्यवाही करू असे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु अजूनही याबाबत कोणतीही कृती झालेली नाही.

गणेश उत्सव झाल्यानंतर एक-दोन महिन्यांनी हा डेटा दिला जाणार असेल तर त्याचा नियंत्रणासाठी फारसा उपयोग नाही हे वास्तव आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तरी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ जागे होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काल मुंबई हायकोर्टानेही या संदर्भात अंमलबजावणी मधल्या त्रुटींवर बोट ठेवत रियल टाईम मोजणी करण्याचे, गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. असे असताना आता मोजणीसाठी पैसे खर्च करूनही याबद्दलची माहिती उपलब्ध होऊ शकत नाही हे या विभागाची अनास्थाच दाखवणारे आहे.

Please follow and like us: