“सत्ता तुमची, मग खड्ड्यांसाठी आंदोलनाची भाषा कशाला?”: काकासाहेब चव्हाणांचा सत्ताधाऱ्यांवर शरसंधान!

पुणे : पुणे महापालिकेत सत्ता भाजपची असून प्रशासनावर नियंत्रणही सत्ताधारी पक्षाचेच आहे. असे असताना शहरातील खड्डे बुजवण्यासाठी सत्ताधारीच प्रशासनाला आठ दिवसांची मुदत देत असतील, तर हा पुणेकरांच्या प्रश्नाचा तोडगा नसून सत्ताधाऱ्यांच्या अपयशाची जाहीर कबुली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते काकसाहेब चव्हाण यांनी केली.

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पुणे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. त्यानंतर बैठका घेतल्या जातात, प्रशासनाला आदेश दिले जातात, आश्वासने दिली जातात; मात्र काही दिवसांनी परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते. त्यामुळे या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.


पुणेकरांना सत्ताधाऱ्यांकडून आंदोलनाच्या घोषणा नकोत, तर खड्डेमुक्त, सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते हवेत. रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असतील तर संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. रस्ते वारंवार खोदण्याची वेळ येऊ नये, यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.


सत्ताधारी पक्षाने प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याची भाषा करण्यापेक्षा आधी प्रशासनावर आपला अंकुश सिद्ध करावा. “सत्ता आमची, पण प्रशासन आमचे ऐकत नाही” हा दावा पुणेकरांना मान्य होणार नाही. सत्ता आणि प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण करणे ही सत्ताधाऱ्यांचीच जबाबदारी आहे.


स्थायी समितीच्या अध्यक्षांनी प्रशासनाला खड्डे बुजवण्यासाठी आठ दिवसांची मुदत देत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. मात्र, आठ दिवसांनंतर सत्ताधारी पक्षालाच प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याची वेळ येणार असेल, तर गेल्या कित्येक महिन्यांपासून पुणे महापालिकेवर सत्ता नेमकी कोणाची आहे? हा प्रश्न पुणेकरांनी विचारायचा का, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.
महापालिकेवर सत्ता असतानाही प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर येणे ही प्रशासनाची नव्हे, तर सत्ताधाऱ्यांची हतबलता आणि प्रशासकीय नियंत्रणाच्या अपयशाची कबुली आहे. पुणेकरांच्या जीवाशी संबंधित असलेल्या रस्त्यांच्या प्रश्नावर इशारे आणि आंदोलनांपेक्षा सत्ताधारी म्हणून कृती करण्याची गरज आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने शहरातील सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करून खड्डे बुजवावेत, निकृष्ट कामांची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते काकासाहेब चव्हाण यांच्या वतीने करण्यात आली.

Please follow and like us: