पुणे : कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी येथे उपचारासाठी येणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडीच्या मुख्य गेटसमोर लोकशाही मार्गाने दि. ३१/८/२०२६ रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.
सदर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या अनेक रूग्णांना योग्य व वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त होत आहेत. तसेच डॉक्टर व संबंधित स्टाफकडून रूग्णांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी असून, अनेक रूग्णांना वारंवार ससून हॉस्पिटल येथे पाठविले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या गंभीर बाबींची दखल घेऊन कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये ईएसआयसी अंतर्गत सध्याची वेतन मर्यादा २१,०००/- वरून ३५,०००/- करण्यात यावी. यासाठी ईएसआयसी प्रशासनाने केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा, ईएसआयसी हॉस्पिटल बिबवेवाडीचे डीन श्री. गायकवाड साहेब यांची तात्काळ बदली करण्यात यावी व हॉस्पिटल प्रशासनात सक्षम व रूग्णाभिमुख अधिकारी नियुक्त करण्यात यावा, ईएसआयसी रूग्णांना अनावश्यकपणे ससून हॉस्पिटल येथे रेफर करण्याची पद्धत तात्काळ थांबवावी. ईएसआयसी च्या नियमानुसार व उपलब्ध सुविधांनुसार आवश्यक असल्यास अधिकृत टाय-अप/Empanelled हॉस्पिटमध्येच रूग्णांना रेफर करण्यात यावे, ज्या उपचारांची सुविधा ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही, अशा रूग्णांना अनावश्यक विलंब न करता तात्काळ योग्य टाय-अप / Empanelled हॉस्पिटलमध्ये रेफर करण्याची स्पष्ट व्यवस्था करण्यात यावी, गंभीर रूग्णांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही, यासाठी Emergency Referral System सक्षम करण्यात यावी, रूग्णांना आवश्यक औषधे, तपासण्या, बेड, डॉक्टरांची उपलब्धता व इतर वैद्यकीय सुविधा वेळेवर मिळाव्यात. औषधे किंवा सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण देऊन रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नये, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचाऱ्यांनी सभ्य, सन्मानपूर्वक व सहकार्याच्या भावनेने वर्तन करावे. गैरवर्तनाच्या तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा सुरू करावी, ईएसआयसी रुग्णांना कोणत्या कारणास्तव दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले, याची लेखी नोंद व रेफरलची पारदर्शक प्रक्रिया ठेवण्यात यावी, ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये रूग्णांना तासन्तास उपचारसाठी प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी OPD व Emergency विभागातील मनुष्यबळ आणि डॉक्टरांची उपलब्धता वाढवावी, रूग्णांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्यासाठी हॉस्पिटलमध्ये २४ तास कार्यरत तक्रार निवारण अधिकारी / हेल्प डेस्क उपलब्ध करून द्यावा, ईएसआयसी अंतर्गत कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना उपलब्ध असलेल्या उपचार व योजनांची माहिती स्पष्टपणे दर्शविणारे माहिती फलक हॉस्पिटलमध्ये लावण्यात यावेत, कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य ही कामगारांच्या प्रश्नांसाठी कार्यरत अधिकृत युनियन असून, संघटनेच्या प्रतिनिधींनी रुग्णांच्या अडचणीबाबत प्रशासनाशी संपर्क साधल्यास त्यांना योग्य सहकार्य व भेटीची अधिकृत व्यवस्था करण्यात यावी, संघटनेमार्फत प्राप्त होणाऱ्या रुग्णांच्या तक्रारींवर प्रशासनाने ठराविक कालमर्यादेत कार्यवाही करून त्याची माहिती संघटनेला द्यावी, ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व वैद्यकीय सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर करून रूग्णांना उपचार करा किंवा योग्य ठिकाणी तात्काळ पाठवा या तत्वानुसार सेवा देण्यात यावी, वरील सर्व मागण्यांवर ईएसआयसी प्रशासनाने संघटनेच्या प्रतिनिधींसोबत लेखी बैठक घेऊन ठोस निर्णय व कालबद्ध कार्यवाही जाहीर करावी. या प्रमुख मागण्या केल्या आहेत.
वरील मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने कामगार व रूग्णांच्या न्याय्य हक्कांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. सदर आंदोलन पूर्णपणे, संविधानिक व लोकशाही मार्गाने करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या सूचनाचे पालन करण्यात येईल. त्यामुळे ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी मुख्य प्रवेशव्दारासमोर सदर आंदोलन करण्यात येणार आहे. असे कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य पुणे संस्थापक अध्यक्ष – श्री. शरद भाकरे म्हणाले आहेत.