पुणे/प्रतिनिधी : पुणे महापालिकेच्या येरवडा येथील हॉटमिक्स प्लांटचे कामकाज अखंडित सुरू ठेवण्यासाठी डांबर, एलडीओ, इमल्शन, रोडबॉन्ड (कोल्डमिक्स) आणि थर्मिक ऑइल अशा पेट्रोलियमजन्य साहित्याच्या सुमारे १४ कोटी रुपयांच्या खरेदीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
येरवडा येथील महापालिकेचा बॅच मिक्स (हॉटमिक्स) प्लांट शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालये तसेच मुख्य पथ विभागाला दररोज डांबरी मिश्रणाचा पुरवठा करतो. या मिश्रणाचा वापर पावसाळ्यातील खड्डे बुजविणे, रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती आणि पुनर्डांबरीकरणासाठी केला जातो. वर्षभर दोन शिफ्टमध्ये प्लांट कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक साहित्याचा सातत्याने पुरवठा आवश्यक असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे.
प्रशासनाने यापूर्वीही २०२३ मध्ये सुमारे १४.२९ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, २७ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या स्थायी समितीच्या ठरावानुसार अधिनियमातील विशेष तरतुदीचा वापर करून उत्पादक कंपन्यांकडून थेट खरेदी करण्यास आयुक्तांना अधिकार देण्यात आले होते. त्याच धर्तीवर यंदाही पुढील दोन महिन्यांसाठी आवश्यक साहित्य थेट खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
प्रस्तावानुसार डांबर (व्हीजी-३० ग्रेड), एलडीओ आणि थर्मिक ऑइल हे साहित्य हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून, तर इमल्शन (आरएस-१, आरएस-२) आणि रोडबॉन्ड (कोल्डमिक्स) हिंदुस्थान कोलास प्रा. लि.कडून खरेदी करण्यात येणार आहे. या खरेदीसाठी कोणतीही अनामत रक्कम किंवा स्वतंत्र करारनामा करण्यात येणार नसल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, येरवडा हॉटमिक्स प्लांटमध्ये पार्कर कंपनीचा नवीन बॅच मिक्स प्लांट कार्यान्वित करण्यात येत असून, त्यासाठी आवश्यक थर्मिक ऑइलचीही प्रथमच खरेदी करण्यात येणार आहे. प्लांटमधील डांबरी मिश्रण आवश्यक तापमानात ठेवण्यासाठी आणि यंत्रणा कार्यरत ठेवण्यासाठी थर्मिक ऑइल आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात विशेष कार्याधिकारी (पथ) या अर्थशीर्षाखाली १३.९९ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध असून, त्यातून पुढील दोन महिन्यांसाठी खर्च करण्यात येणार आहे