पुण्यातील सर्व गणपती आगमन-विसर्जन मार्गावरील सर्व खोदकामे तात्काळ थांबवा; आपची मागणी

पुणे : पुणे शहरातील गणपती आगमन आणि विसर्जन मार्गांवर सध्या विविध विभागांकडून रस्ते खोदणे, ड्रेनेज, पाणीपुरवठा, केबल, रस्ते दुरुस्ती व इतर विकासकामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी कामे अर्धवट असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, माती, दगड व बांधकाम साहित्य पडलेले आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या काळात लाखो नागरिक आणि गणेश मंडळांच्या मिरवणुकीच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवर कामे सुरू ठेवण्याची घाई प्रशासनाला नेमकी कशासाठी? असा सवाल आम आदमी पार्टीचे मीडिया सहसंयोजक निरंजन मधुकर अडागळे यांनी उपस्थित केला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात या मार्गांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होते. अशा परिस्थितीत रस्त्यावरील खड्डे, उघडी खोदकामे आणि अर्धवट कामे ही केवळ वाहतूक कोंडीची समस्या नसून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी बाब आहे.

विसर्जन होईपर्यंत कामांना स्थगिती द्या

पुणे महानगरपालिकेने गणपती आगमन व विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या संपूर्ण शहरातील प्रमुख मार्गांची तातडीने पाहणी करून, मिरवणुकीस अडथळा निर्माण करणारी सर्व खोदकामे व कामे विसर्जन पूर्ण होईपर्यंत स्थगित करावीत, अशी मागणी आपच्या वतीने करण्यात आली आहे.

तसेच ज्या ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत, तेथील सर्व खड्डे तातडीने योग्य पद्धतीने बुजवून रस्ते वाहतुकीस सुरक्षित व समतल करावेत.

ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करा

गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुरक्षित करण्याची जबाबदारी संबंधित विभाग आणि ठेकेदारांची आहे. कामे अर्धवट ठेवून नागरिकांना धोक्यात टाकणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करावी. रस्ते खोदण्यास परवानगी देताना गणेशोत्सवाच्या कालावधीचा विचार का करण्यात आला नाही, याचीही चौकशी करण्यात यावी.

“गणेशोत्सव संपल्यानंतर विकासकामे करा; मात्र गणेश मिरवणुकीच्या मार्गावरच खड्डे आणि खोदकामे ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळू नका,” असा इशारा महासचिव सुभाष कारंडे यांनी दिला.

या संदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करून पुणे शहरातील गणपती आगमन व विसर्जन मार्ग सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Please follow and like us: