१५ लाखांवरून दर थेट साडेबारा लाखांवर; गणेशोत्सव-नवरात्रासाठी २५ दिवसांची व्यवस्था
पुणे : गणेशोत्सव आणि नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत पुणे महापालिका हद्दीत विसर्जित होणाऱ्या गणेशमूर्ती तसेच दुर्गादेवीच्या मूर्तींचे सन्मानपूर्वक पुनर्विसर्जन करण्यासाठी खाण भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. यासाठी मागविण्यात आलेल्या कोटेशनमध्ये सर्वांत कमी दर देणाऱ्या भावडी येथील खाणमालक सोमनाथ तांबे यांच्याकडून २५ दिवसांसाठी खाण घेण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता देत सुरुवातीला १५ लाख रुपये दर सादर करणाऱ्या खाणमालकाने चर्चेनंतर हा दर कमी करून १२ लाख ५० हजार रुपये केल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मूर्तींचे पुनर्विसर्जन करण्यासाठी खाण उपलब्ध करून घेण्यात आली आहे. दर कमी करण्यासाठी महापालिकेने संबंधित खाणमालकाशी चर्चा केली. त्यानंतर तांबे यांनी १५ लाख रुपयांचा दर कमी करून १२ लाख ५० हजार रुपये इतका फेरदर सादर केला. दरवर्षी खाणीच्या भाड्यात सुमारे १५ टक्के वाढ होत असते. मागील वर्षी दरवाढ न झाल्याने यंदा दोन वर्षांची वाढ तसेच दुर्गादेवी महोत्सवासाठी वाढणारे पाच दिवस विचारात घेऊन १५ लाख रुपयांचे कोटेशन दिल्याचे त्यांनी महापालिकेला कळविले. मात्र, महापालिकेचा विचार करून कमी दरात काम करण्याची तयारी दर्शविली.
गणेशोत्सव आणि दुर्गादेवी महोत्सव हा संवेदनशील विषय असल्याने पुनर्विसर्जनाची व्यवस्था वेळेत करणे आवश्यक आहे. त्यामुळे १२ लाख ५० हजार रुपयांच्या फेरसादर दरानुसार खाण भाडेतत्त्वावर घेण्यास हरकत नसल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. या कामासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे आवश्यक तरतूद उपलब्ध आहे.