पुणे : पुणे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांशी संबंधित विविध कामांना स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पाणीपुरवठा, विद्युत यंत्रणा, घनकचरा, आरोग्य तसेच देखभाल-दुरुस्तीच्या कामांचा यामध्ये समावेश आहे. आचारसंहितेच्या काळात अत्यावश्यक सेवा विस्कळित होऊ नयेत, यासाठी प्रशासनाशी चर्चा करून निकडीच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर पाणीपुरवठा, जलवाहिन्या, पंपिंग यंत्रणा आणि आरोग्याशी संबंधित आवश्यक कामांना मंजुरी देण्यास अडचण नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार स्थायी समितीने विविध प्रस्तावांना मान्यता दिली, असे भिमाले म्हणाले.
स्वारगेट पाणीपुरवठा कार्यालयाच्या अखत्यारित गुजरवाडी फाटा, कात्रज-कोंढवा रस्ता, गुजर-निंबाळकरवाडी आणि नवीन धायरी भागातील जलवाहिन्यांची देखभाल-दुरुस्ती, तसेच बालाजीनगर, काशिनाथ पाटीलनगर परिसरातील पाणी वितरण व्यवस्था नियंत्रित करण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. खडकवासला, नांदेड, किरकटवाडी, सणसनगर, नांदोशी तसेच नव्याने समाविष्ट नऱ्हे भागातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचाही यात समावेश आहे.
मुंढवा जॅकवेल व पंपहाउस येथील पंप क्रमांक ५ व ८ साठी स्पेअर पार्ट पुरविणे व दुरुस्ती, मोटार, ट्रान्सफॉर्मर, स्टार्टर आणि अन्य विद्युत यंत्रणेच्या देखभालीसाठी अनुक्रमे सुमारे ४९ लाख आणि ८८ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. जुने लष्कर जलकेंद्र आणि नवीन होळकर, चिखली जलकेंद्रातील व्हीटी पंपांच्या दुरुस्तीची कामेही मंजूर झाली.
गणेशोत्सव व अन्य उत्सवांसाठी मोबाईल टॉयलेट पुरविणे व देखभाल करण्यासाठी सुमारे ६९.८५ लाख रुपयांच्या कामास मान्यता देण्यात आली. विविध कचरा प्रक्रिया प्रकल्पांतून निर्माण होणारा रिजेक्ट कचरा शास्त्रोक्त भूभरावापर्यंत वाहून नेण्यासाठी हायवा टिपर उपलब्ध करण्याच्या सुमारे ७९.९४ लाख रुपयांच्या कामालाही मंजुरी मिळाली. तसेच बालगंधर्व रंगमंदिराच्या सुधारणेसाठी सुमारे ६९.३४ लाख रुपयांच्या कामास मान्यता देण्यात आली.
याशिवाय प्रभाग क्रमांक ३ मधील विमाननगर, सोमनाथनगर, संजय पार्क, बर्माशेल आदी भागांतील देखभाल-दुरुस्तीची सुमारे ७६.५६ लाख रुपयांची कामे आणि प्रभाग क्रमांक ११ मधील पाणीपुरवठा विषयक दैनंदिन व्हॉल्व्ह संचालनाच्या सुमारे ८१.७७ लाख रुपयांच्या कामासही मंजुरी देण्यात आली.