२५० विशेष गुणवत्ताप्राप्त १०वी तील जैन विद्यार्थी, विद्यार्थिनींचा वीतराग सेवा संघ (साधना सदन) तर्फे सन्मान

पुणे : राष्ट्रसंत आचार्य सम्राट प.पू.आनंदऋषीजी म.सा. यांच्या १२७ व्या जन्मजयंती सप्ताह निमित्त प.पू. रमणीक मुनीजी म.सा.आदी ठाणा ३, साध्वी रत्ना प.पू. हिमानी जी म.सा. आदी ठाणा ६ यांच्या आशीर्वादाने शिवशंकर सभागृह, महर्षीनगर येथे वीतराग सेवा संघ, साधना सदन पुणे तर्फे सुमारे २५० विशेष गुणवत्ताप्राप्त १० वी तील विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सन्मान समारोह आयोजन करण्यात आला. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. सुरेश गोसावी ( कुलगुरू, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे ), प्रमुख वक्ता – शरद तांदळे ( उद्योजक, लेखक, प्रेरक वक्ते ), समारोह अध्यक्ष – विजय गांधी ( CEO,M-Tech Innovation Ltd,Pune ), विशेष अतिथी – फुलचंद बांठिया ( बांठिया समूह, उद्योजक ), विशेष उपस्थिती विजयकांत कोठारी, (अध्यक्ष, साधना सदन श्री संघ,पुणे ) श्री अचल जैन ( अध्यक्ष, जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणे ),श्री दिलीप कांकरिया ( अध्यक्ष, वीतराग सेवा संघ ) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले.


सन १९८१ मधे साधना सदन येथे “वीतराग सेवा संघ ” ची स्थापना करण्यात आली. जैन समाजात धार्मिक चेतना जागृत करण्यासाठी व धर्म चा प्रकाश प्रत्येका पर्यंत पोहोचण्यासाठी या संघाची स्थापना करण्यात आली. वीतराग सेवा संघ निरंतर गेले ४५ वर्ष समाज उपयोगी कार्य करत आहे. जीवनदायिनी रक्तदान शिबीर, जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, महावीर जन्म कल्याणक महोत्सव , गौसेवा, योग् शिबीर, आरोग्य शिबीर, समाजातील गरजू लोकांना व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत असे विविध सेवाभावी कार्य या वीतराग सेवा संघ मार्फत करण्यात येते.


प्रमुख वक्ते शरद तांदळे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, आमच्या काळात कॉम्पिटिशन नव्हते, पण मुलं कमी आणि पालक जास्त परीक्षेत बसतात. सध्या नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे, मुलं सुसाईट करायला लागले आहेत. मार्क कमी पडले असेल तरी जिवंत राहायला शिका. हसत हसत आलेल्या अनेक समस्यांना सामोरे जा, क्षमते पेक्षा जास्त काम करा. सध्या ए.आय. ( AI ) चे युग आले आहे, सोशल मीडिया, वॉट्सअप चा वापर किती करायचा याचा विचार करावा कारण याच्या आहारी गेले तर तुमचा मेंदू कंट्रोल होईल. चांगले मार्क मिळालेल्या मुलांची गुलामीची फौज तयार होईल. अकॅडेमिक मार्क तुम्ही माणूस कसे आहेत हे ठरवत नाही, आपल्याला ज्या विषयात आवड आहे ते करा, घरच्यां बरोबर संवाद करा, मनात द्वेष नसावा, कारण द्वेष असलेली माणसं चांगला इतिहास घडवू शकत नाही. देशाचा इतिहास वाचा. धर्माचा इतिहास वाचा, आणि तो नाही वाचला तर येणाऱ्या काळात फक्त रोबोट तयार होतात की काय. पालकांना विनंती आहे मुलांबरोबर आनंदात रहा, त्यांच्या खांद्यांवर ओझे टाकू नका, त्यांना विश्वासात घेऊन त्यांना ज्या विषयात आवड आहे त्यात त्यांना प्रोत्साहन द्या तरच आनंदी देश आपण घडवू शकतो.


प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. सुरेश गोसावी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, मुलं ज्यावेळेला १०वी, १२ वीत पास होतात त्याचे कौतुक व्हायला पाहिजे, ते कार्य वीतराग सेवा संघ गेले ४५ वर्ष आपल्या संस्थेच्या माध्यमातून अविरत समाज कार्य करत आहे. हा मुलांच्या गुणांचा गौरव नाहीतर त्यांच्या संघर्षाचा सन्मान आहे. फक्त त्यांचा सत्कार नसतो तर त्यांच्या आईने जागवलेल्या रात्रीचा सन्मान असतो, त्यांच्या वडिलांचा कामाचा सन्मान असतो, आणि शिक्षकांनी विश्वास ठेवलेला आहे त्या शिक्षकांचा विश्वासाचा सन्मान असतो. ज्यावेळेला ही मुलं सन्मान स्वीकारतील त्यावेळेला हे लक्षात ठेवायला पाहिजे, अदृश्यपणे त्याच्या बरोबर त्याचे आई वडील, शिक्षक ही अदृस्यपणे सन्मान स्विकारत आहेत. सध्या गुणापेक्षा गुणवत्ता अधिक महत्वाची आहे, आणि गुणवत्ते पेक्षा माणुसकी अधिक महत्वाची आहे. बुद्धीमत्ता बुद्धिमान लोकांची गरज नाही तर संवेदनशील, प्रामाणिक आणि समाजासाठी झटणाऱ्या घटकांची आवशकता आहे. पालकांना विनंती आपल्या मुलांना मोठं घर, संपत्ती देण्यापेक्षा उत्तम संस्कार दिले पाहिजे.


विजय गांधी, फुलचंदजी बांठिया, विजयकांत कोठारी, अचल जैन, दिलीप कांकरिया ( अध्यक्ष, वीतराग सेवा संघ ) यांनी सुद्धा उपस्थित सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.


आलेल्या पाहुण्याच्या हस्ते २५० विशेष गुणवत्ताप्राप्त १० वी तील विद्यार्थी, विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्न व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच या प्रसंगी वीतराग सेवा संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी वीतराग सेवा संघाचे सुनील मुथा, संजय मुथा, अभय नहार, कांतीलाल भंडारी, जवाहर चंगेडिया, सुनील बोकरिया, देवेंद्र मुथा, सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी, जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय ओस्तवाल, सूत्रसंचालन अनिल गेलडा व सर्वांचे आभार प्रवीण गुंदेचा यांनी मानले.

Please follow and like us: