महापालिकेची परवानगी असतानाही मंडळाची कमान झाकण्याचा प्रयत्न; तक्रारी करूनही कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
पुणे : पुण्याच्या गणेशोत्सवातील मानाचा केसरीवाडा गणपतीच्या स्वागतासाठी अधिकृत परवानगी घेऊन उभारण्यात आलेल्या कमानीसमोरच अनधिकृत कमानी उभारण्यात आल्याने संस्थेच्या स्वागत व्यवस्थेला अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, याबाबत महापालिका प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने केसरीवाडा गणेशोत्सव पदाधिकार्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात येत आहेत. मात्र, या कमानींसाठी महापालिका प्रशासनाने काही नियम व अटी निश्चित केल्या आहेत. त्यानुसार केसरीवाडा गणपती मंडळाने आवश्यक ती अधिकृत परवानगी घेऊन स्वागत कमान उभारली आहे. असे असतानाही गणेशोत्सवाच्या कमानीला अडथळा निर्माण होईल, तसेच ती झाकली जाईल अशा पद्धतीने अन्य कमानी उभारण्यात आल्या आहेत.

यामुळे केसरीवाडा गणपतीच्या दर्शनासाठी व स्वागतासाठी येणार्या भाविकांना कमानी पाहता येणार नाहीत. तसेच मानाच्या गणपतीच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या अधिकृत कमानीचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना पदाधिकार्यांनी व्यक्त केली आहे.
तक्रार करूनही कारवाई नाही
अनधिकृत कमानी उभारून अधिकृत कमानीला अडथळा निर्माण केल्याच्या प्रकाराची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या प्रमुखांना देण्यात आली. त्याचप्रमाणे संबंधित पोलिस ठाण्यातही संस्थेच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने पोलिस प्रशासनाला याबाबत कळविल्याचेही मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, तक्रार करूनही प्रत्यक्ष ठिकाणी कारवाई झालेली नसल्याने प्रश्न उपस्थित झाला आहे.
गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. अशा परिस्थितीत अनधिकृत कमानींमुळे वाहतुकीला तसेच भाविकांच्या सुरक्षिततेला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकृत परवानगी असलेल्या कमानींची अडवणूक करणार्या अनधिकृत कमानी तातडीने हटवाव्यात, अशी मागणी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासनाने तक्रारीची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि नियमबाह्य कमानींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
मानाच्या गणपतीच्या तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
उत्सव काळात रस्त्यांवर टाकण्यात येणार्या स्वागत कमानीबाबत महापालिका प्रशासनाने नियमावली तयार केली आहे. संबंधित कमानींचा वाहतूकीसह अन्य कमानीला अडथळा होऊ नये, हा त्यामगचा हेतू आहे. मात्र मानाच्या गणपती मंडळालाच अनधिकृत कमानीचा अडथळा सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रार करूनही महापालिका प्रशासन कारवाई करत नसल्याने महापालिका प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मानाच्या गणपतीला न्याय मिळत नसेल, तर अन्य गणेश मंडळांचे काय? अशी चर्चा शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांत सुरू झाली आहे.