विमाननगर खाऊ गल्लीशेजारील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था

दुर्गंधीमुळे स्केटिंगसाठी येणाऱ्या लहान मुलांना त्रास; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे/विमाननगर : विमाननगर येथील खाऊ गल्ली, जैवविविधता पार्क आणि आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंगच्या शेजारी असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, या संदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.

सदर सार्वजनिक स्वच्छतागृहातून सतत तीव्र दुर्गंधी येत असून या दुर्गंधीचा त्रास परिसरातील नागरिकांसह आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंगमध्ये येणाऱ्या लहान मुलांना व मुलींना होत आहे.

या स्केटिंग रिंगमध्ये ३ वर्षे वयापासून पुढील लहान मुले व मुली प्रशिक्षणासाठी येतात. त्यामुळे त्यांना प्रशिक्षणासाठी येताना अशा दुर्गंधीचा सामना करावा लागणे ही गंभीर बाब आहे. लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे, जैवविविधता पार्क आणि खाऊ गल्लीसारख्या नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणाच्या अगदी शेजारी सार्वजनिक स्वच्छतागृहाची अशी अवस्था असणे हे पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता व देखभाल व्यवस्थेचे अपयश दर्शविते.

या स्वच्छतागृहाची तातडीने पाहणी करून संपूर्ण स्वच्छता, निर्जंतुकीकरण, आवश्यक दुरुस्ती, पाणीपुरवठा आणि दुर्गंधीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी. तसेच नियमित साफसफाई व देखभालीची व्यवस्था करावी.

नागरिकांच्या आरोग्याशी आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाबींमध्ये प्रशासनाने हलगर्जीपणा करू नये. संबंधित अधिकारी व कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित करून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सागर शिवाजी खांदवे यांनी केली आहे.

Please follow and like us: