पुणे : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशाने अमानुष लाठीमार करण्यात आला. खिळे लावलेल्या लाठ्यांचा वापर करण्यात आला. पॅलेट गनचा वापर करण्यात आला. १५० हून अधिक विद्यार्थी दवाखान्यात दाखल झाले. महिला व अल्पवयीन मुलांनाही अमानुष मारहाण करण्यात आली. याला सर्वस्वी जबाबदार अमित शहा आहेत. ते पुण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत अमित शहा गो बॅक नारे देत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी शांततेत केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्या दिल्ली पोलीस आणि त्यांचा पाठीराखा यांनी नैतिक जबाबदारी घेवून राजीनामा देणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करून विद्येचे माहेरघर पुण्यनगरीत भारताचे गृहमंत्री अमित शहा आले असता त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. यावेळी मार्केट यार्ड पोलिसांनी अॅड. अरविंद तायडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या सुमारे ४० ते ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात नेले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी भाजपच्या कृत्यांचा निषेध केला, तसेच पोलिस यंत्रणेचा बळाचा वापर करून आंदोलने दडपण्याचे काम भाजप करत आहे. असे शहराध्यक्ष अॅड. अरविंद तायडे यांनी सांगितले.