शहरातील वाहतुक कोंडी सुरळीत होणार
पुणे : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका क्षेत्रातील २५० महत्त्वाच्या चौकांमध्ये ५०० ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ६७-३ (क) अंतर्गत तातडीची कार्यवाही करून हे काम करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. या कामासाठी वर्षभरात सुमारे १७ कोटी ९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून महापालिकेकडे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. महापौर मंजुषा नागपुरे यांनीही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीने ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासंदर्भात १४ ऑगस्ट रोजी महापालिका आणि वाहतूक पोलिस विभागाची बैठक झाली होती.
वाहतूक पोलिस विभागाने सुचविलेल्या २४२ चौकांमध्ये प्रत्येकी दोन ट्रॅफिक वॉर्डन आणि एक वाहतूक पोलिस कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. याशिवाय बावधन वाहतूक विभागातील आठ चौकांसाठी १६ ट्रॅफिक वॉर्डनची आवश्यकता आहे. त्यामुळे एकूण २५० चौकांसाठी ५०० ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करावे लागणार आहेत.
या कामासाठी महापालिकेच्या २०२६-२७च्या अंदाजपत्रकात ‘वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार वाहतूक नियोजनाची कामे करणे’ या अर्थशीर्षकाखाली १७० लाख रुपयांची तरतूद उपलब्ध आहे. कामाचे पूर्वगणपत्रक १७ कोटी ८ लाख ९९ हजार ५६० रुपये इतके तयार करण्यात आले आहे. यापूर्वी हे काम बी-२ पद्धतीने तसेच सात दिवसांच्या अल्प मुदतीच्या निविदा प्रक्रियेतून करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, निविदा प्रक्रिया, प्रशासकीय मान्यता आणि कार्यादेश देण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
संबंधित ठेकेदाराने सेवा शुल्कासह एका ट्रॅफिक ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती, उपलब्धता आणि मनुष्यबळ पुरविण्याची कार्यवाही यापूर्वी सुरक्षा विभागामार्फत करण्यात आली होती. त्यामुळे हे काम सुरक्षा विभागामार्फत करून घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने चौकांवरील वाहतूक नियमन, कोंडी कमी करणे आणि नागरिकांची सुरक्षितता यासाठी हे मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्तांनी वाहतूक कोंडीची तातडी लक्षात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ६७-३ (क) नुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या तरतुदीनुसार जनतेची सेवा, सुरक्षितता किंवा महापालिकेच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी आणीबाणीच्या परिस्थितीत आयुक्तांना तातडीची कार्यवाही करण्याचा अधिकार आहे.