पुणे : १५ डिसेंबर २०२५ रोजी लक्ष्मीनगर पोलिस स्टेशनची स्थापना झाली. या आधी येरवडा परिसर येरवडा पोलिस ठाणेच्या अखत्यारित होता. नव्याने सुरू झालेल्या लक्ष्मीनगर पोलिस ठाण्याचे पहिले वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून रविंद्र कदम या धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली.
येरवडा परिसर हा पूर्वी गुन्हेगारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. चोऱ्या, हाणामाऱ्या, जीवे मारण्याचे प्रयत्न, खून, लूटमारी, शिवीगाळ, व्यसनाधिनता, भाईगिरी, टोळीयुध्द, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड, गुन्हेगारांची सर्वसामान्य नागरिकांमध्ये स्पष्टपणे निदर्शनास येणारी दहशत….. अशा सर्व घटनांनी आणि घडामोडींमुळे पुणे शहरात येरवड्याची ओळख लज्जास्पद झाली होती. परंतु रविंद्र कदम या सिंघम पोलिस अधिकाऱ्यांच्या जबरदस्त कारवायांमुळे येरवडा परिसराची गुन्हेगारीबाबत काळवंडलेली प्रतिमा अलिकडच्या काळात गुन्हेगारीचा बिमोड करून ती उजळलेली दिसून येते.
सध्या वरील प्रमाणे संबंधित गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाया करून येरवडा परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात रविंद्र कदम हे धाडसी आणि निर्भीड पोलिस अधिकारी यशस्वी झाले आहेत, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्यांचे केवळ नाव ऐकले तर येरवडा परिसरातील गुन्हेगारांना धडकी भरते, हे कोणीही नाकारू शकत नाही.
अक्षम्य गुन्हे करणाऱ्या निगरगट्ट आणि सराईत गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवून त्यांना सुतासारखे सरळ करण्यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांना आणि त्यांच्या अधिपत्त्याखालील तसेच नेतृत्वाखालील कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना आणि पोलिस कर्मचाऱ्यांना यश आले आहे. आणि तेसुध्दा अवघ्या सात- आठ महिन्यामध्येच, हे विशेष! असे अधिकारी याच ठिकाणी आगामी दोन-तीन वर्षे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून टिकून राहिल्यास येरवडा परिसर गुन्हेगारीमुक्त होण्यास फारसा विलंब लागणार नाही, एवढे मात्र निश्चित !
येरवडा परिसरात दररोज आपल्या अधिनस्थ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत पायी पेट्रोलिंग करून रविंद्र कदम यांनी गुन्हेगारी करणाऱ्यांवर वचक ठेवला आहे. त्यांना बघूनच अनेक गुन्हेगारांची पळता भूई थोडी होऊन जाते. गंभीर गुन्हे करणाऱ्यांची वेळप्रसंगी पोलिसी स्टाईलने धुलाई केली जाते. अशांचा ‘सत्कार’ तर ‘तसाच’ झाला पाहिजे. ‘गुन्हा केला तर येरवडा जेल’ अशी धडकीच आता येरवडा परिसरातील गुन्हेगारांना भरली आहे. कायद्याचे पालन करणे, कायद्याची शिस्त पाळणे हे आता येरवडा परिसरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आणि लोकप्रतिनिधींसाठी अलिखित पायंडाच पडला आहे, तो केवळ आणि केवळ सिंघम पोलिस अधिकारी रविंद्र कदम यांच्यामुळेच !
येरवडा परिसरातील अवैध आणि बेकायदेशीर धंद्यांवर धडाकेबाज कारवाया करून रविंद्र कदम यांनी आतापर्यंत सुमारे पन्नासपेक्षा अधिक हातभट्टी दारूधंदे उद्धवस्त केले आहेत. तर गेल्या सहा महिन्यांत येरवडा परिसरात सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या आणि गुन्हेगारीमध्ये बडेजाव मारणाऱ्या छोट्यामोठ्या भाईगिरी करणाऱ्या अनेकांना तडीपार करण्याची धडक मोहिमसुध्दा रविंद्र कदम यांनी राबविली आहे.
‘चांगल्यासाठी चांगला आणि वाईटांसाठी वाईट ही लक्ष्मीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांची स्टाईल मला आवडली. काही काही घटनांमध्ये, ‘खाकी वर्दीतही असतो माणुसकीचा झरा’ याचाही प्रत्यय आल्याचे पहायला मिळाले. गेल्या २५ वर्षांच्या माझ्या पत्रकारीतेच्या कालावधीत मी पाहिलेला जबरदस्त डॅशिंग, धडाकेबाज, निर्भीड, स्पष्ट भूमिका घेणारा, कर्तव्यदक्ष आणि तत्पर पोलिस अधिकारी म्हणजेच रविंद्र कदम होय. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला शब्दांचा साज चढवून त्यांच्या कारकीर्दीचे चमकणारे कोंदण लोकांसमोर उलगडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. माझ्या या भूमिकेशी बहुतांश नागरिक सहमत असतीलच म्हणा !
आणि हो…. त्यांची कार्यशैली अनेकांच्या डोळ्यात खुपतेसुध्दा ! काही जणांचे हितसंबंध बिघडल्यामुळे तसेच काही जणांची दुकानदारी बंद झाल्यामुळे त्यांची बदली व्हावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घालून ठेवले आहेत असे समजते. परंतु रविंद्र कदम या जिगरबाज पोलिस अधिकाऱ्याला पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेशकुमार आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पाठबळ आणि मार्गदर्शन असल्याने बदलीचे दिवास्वप्न पाहणाऱ्यांच्या स्वप्नाचा चक्काचूर होताना आम्ही पाहत आहोत.
‘उपेक्षितांचे अंतरंग’ ओळखणाऱ्या आणि ‘माणुसकीचा गहिवर’ असलेल्या रविंद्र कदम या पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीला शतशः सलाम! त्यांच्याकडे येणाऱ्या गरजू नागरिकाला न्याय मिळतोच. गुन्हेगारांना उपदेशाच्या गोळ्या त्यांच्याकडे नसतात, तर गुन्हेगारांना कळणारसुध्दा नाही असे कायदेशीर इंजेक्शन त्यांच्याकडे असते. हे वारंवार पहायला मिळतेच. म्हणून पोलिस अधिकारी कसा असावा? असे जर कोणी मला विचारले तर मी म्हणेन, रविंद्र कदम यांच्यासारखा असावा.
लमाण तांड्यामधील दारूच्या शेकडो हातभट्ट्या उद्धवस्त केल्यानंतर त्या धंद्यांवर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या शेकडो महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्याचा अभिनव उपक्रम रविंद्र कदम यांनी राबविला. अनेक क्लीस्ट गुन्हेगारीची उकल करण्यात ते आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले आहेत. त्यांच्या कार्यपध्दतीचा गौरव म्हणून पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानितसुध्दा केले आहे. रविंद्र कदम यांच्या कामाच्या प्रशंसनीय पध्दतीमुळे चुकीचे कृत्य करणाऱ्यांचे पाऊल लक्ष्मीनगर पोलिस ठाण्याकडे वळतही नाही, हेसुध्दा तितकेच खरे आहे.
येरवडा – लक्ष्मीनगर परिसरातील सामाजिक स्वास्थ्य चांगले राहावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या संवेदनशील अधिकाऱ्याला पुढील कार्यकालासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!